Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: उंच, भव्य आणि देखण्या गणेशमूर्तींनी खुलले मुंबईचे रस्ते; पुढच्या वर्षी लवकर या… चा घोष

10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. सर्वत्र कल्ला असणारं आणि गजबजाटाचं वातावरण, घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होणार आहे.
गणपतीबाप्पाच्या विसर्जनासाठी अर्थात अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी आता मुंबई पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनाही या प्रसंगी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 10 दिवसांनंतर बाप्पा निरोप घेणार असल्यामुळं अर्थातच अनेकांच्याच भावना दाटून आल्या आहेत, त्यामुळं पुढच्या वर्षी लवकर या… अशी प्रार्थना करत आज या बाप्पांना निरोप दिला जात आहे.
मुंबईतील चिंचपोकळी परिरात प्रचंड गर्दी
चिंचपोकळी, लालबाग आणि परळ परिसरात तूफान गर्दी. लालबागचा राजा गणेश गल्ली परिसरातून पुढे मार्गस्थ, तर नरेपार्क, गणेशगल्ली आणि इतर मंडळांचे गणपती चिंचपोकळी पुलावरून पुढील मिरवणुकीसाठी मार्गस्थ.
चिंचपोकळीतील श्रॉफ बिल्डींग येथे गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी ‘ही शान कोणाची, मुंबईच्या राजाची…’ असा एकच जयघोष झाल्याचं पाहायला मिळालं.
10 दिवसांच्या पाहुणचारानंतर विसर्जनासाठी निघालेल्या बाप्पांचं गिरगाव चौपाटीवर आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतींसमवेत इथं सार्वजनिक गणेशमूर्तींचंही आगमन होण्यास सुरुवात.
अनंत चतुर्दशीचा उत्सव मुंबई महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जात आहे. मुंबईच्या गिरगांव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी लक्षावधी गणेशभक्त हजेरी लावतात. त्या अनुषंगाने सरकार, महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांच्या काळजीच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.
प्रचंड गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे. सध्याच्या घडीला राजाची मिरवणूक लालबाग चौकातून युटर्न घेवून भारतमाता चौकाकडे जात आहे. इथून पुन्हा गणपतीची ही भव्य मिरवणूक निर्धारित मार्गावर मार्गस्थ होईल. सध्या लालबागच्या राजासमवेत कॉटनचा राजा आणि इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मार्गस्थ झाल्या आहे.
लालबाग आणि नजीकच्या परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दी झाली असून, या गर्दीमध्ये येण्याआधी येथील परिस्थितीचा आढावा घेऊन येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय गर्दीच्या समयी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही गणेशोत्सव मंडळं करत आहेत.