काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली, नव्या आजाराची लागण

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांआधीच करोनावर मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
खासदार राजीव सातव यांनी करोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होतं. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आलं होतं. पण अखेर ते यातून बरे झाले. त्यांचा करोना अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे.
न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. खरंतर, करोनाची लागण झाल्यामुले सातव यांना खूप त्रास झाला. यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट देत सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर कदम यांनी प्रकृती स्थिर असून ते करोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील अशा विश्वास व्यक्त केला होता.
अखेर या जीवघेण्या संसर्गावर सातव यांनी यशस्वी मात केली पण त्यांना आता न्युमोनियाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पक्षातही चिंतेचं वातावरण आहे.