Ajit Pawar: गर्दी वाढत राहिली तर…; अजित पवारांनी बारामतीकरांना केले सतर्क

बारामती:बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात करोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. ( Ajit Pawar on Coronavirus In Baramati )
वाचा: अनलॉकबाबत आदेश निघाला मध्यरात्री; पूर्ण लॉकडाऊनमुक्तीसाठी ‘हा’ निकष
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड- १९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी ते बोलत होते. सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे परंतु हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रुग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथील करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहिली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जर रुग्णसंख्या ५ टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथील करता येतील. शासन व स्थानिक प्रशासन करोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्यावतीने बारामती येथील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.