नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळधार

शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसानं मुंबई, पालघर, ठाण्यालाही ओलंचिंब केलं. असा हा पाऊस पुढील दोन दिवस तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसेल. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल. राज्याच्या किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकणार असून, आता हिवाळ्यातही पावसाळाच अनुभवावा लागणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात येणार असून, कमाल तापमान सरासरी 33 अंशांच्या घरात राहील.
इथं कोसळधार…
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळणार असून, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी पालघर जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याच धर्तीवर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तिथे मुंबईसोबतच रायगडमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. रायगडच्या अलिबाग, कर्जत, खालापूर, खोपोली, माथेरान मध्ये ही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी लावली होती. या अवकाळीमुळं भात पिकाचं नुकसान होण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरासह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मध्यरात्रीपासून काही ठिकाणी जोरदार तर काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस सुरुच आहे.