देश

Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब

अदानींच्या (Adani) मुद्द्यावरुन सर्व विरोधकांनी संसदेत स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली आहे. सध्या अर्थसंकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल त्यानंतर अदानींबाबत चर्चेसाठी वेगळा वेळ दिला जाईल असे लोकसभा अध्यक्षांनी म्हटल्यानंतर विरोधकांकडून सदनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. गदारोळानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

अदानींच्या मुद्द्यावरुन आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली. सदनातील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत सकाळी विरोधकांची बैठक देखील झाली. या बैठकीत 16 पक्षाचे नेते सहभागी झाले होते. खर्गे यांच्या कक्षात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत कॉंग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय (एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन यूनिअन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), केसी (थॉमस) आणि आरएसपी हे पक्ष सहभागी झाले होते.

एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर काँग्रेस निदर्शने करणार

गुरूवारी हिंडनबर्ग रिसर्चनंतर संसदेत अदानीच्या मुद्द्यावर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ झाला. दरम्यान 6 फेब्रुवारीला देशातील सर्व जिल्ह्यात एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर कॉंग्रेस निदर्शने करणार आहेत.

अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ सबस्क्राईब करण्याकरता आला त्याचवेळी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात 106 पानी अहवाल सादर केला आणि त्याचा फटका अदानी समुहाला बसला. यासंदर्भात अदानी समुहाने उत्तर देत हिंडनबर्ग रिसर्चवर कारवाई करणार असल्याचा खुलासा देखील केला. मात्र भारतीय शेअर बाजारातील अदानी समुहातील कंपन्यांच्या समभागात पडझड सुरुच राहिली आहे.

Related Articles

Back to top button