.मोठी बातमी । शिवसेना फुटीवर असताना उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा

शिवसेनेने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्यास स्थगिती देण्याची विनंती शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तो अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला आहे. हे प्रकरणसर्वोच्च न्यायालयात सुरु असताना निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये, असा शिवसेनेचा अर्ज होता. आता या याचिकेवर इतर याचिकांसोबत 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका स्विकारल्याने हा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा दिलासा मानला जात आहे. एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवरील निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत खरा शिवसेना पक्ष कोणता हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, असे उद्धव ठाकरे शिवसेनेने म्हटलं आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे 8 ऑगस्टपर्यंत दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशालाच उद्धव ठाकरे यांच्यावतीने आव्हान दिले आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरु असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. मात्र निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली होती.