मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडल्याची नोंद झाली. तर पुढील तीन – चार तासांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून मुंबईत आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या आठवड्याच्या सुरूवातीपासून मुंबईत दमदार पाऊस पडला. त्यामुळे मुंबईत सरासरीपेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली. तसेच पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र गुरुवारी मध्यरात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मुंबईतील काही भागात शुक्रवारी सकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.
गेल्या २४ तासांमध्ये (शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत) सातांक्रूझमध्ये ४१.१ मिमी, तर कुलाब्यामध्ये ५२.८ मिमी पावसाची नोंद झाली.
उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या परिसरात पुढील तीन – चार तासांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण महाराष्ट्रपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे.