मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे| हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट

गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाकडून पुढचे 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने मुंबईसाठी दुपारी 1 वाजल्यापासून रेड अलर्ट दिला आहे.
त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, प्रवासाचं नियोजन करू बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीची दाणादाण उडाली होती. लोकल ट्रेन आणि बसही उशिराने धावत होत्या. येत्या 24 तासात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात रायगड आणि रत्नागिरीमध्येही रेड अलर्ट देण्यात आला आहे. अति मुसळधार पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा इशारा पुढचे तीन दिवस देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मध्यम ते दाट ढग आहेत. दक्षिण कोकण ते कर्नाटकपर्यंत थोडी अधिक तीव्रता आहे. त्यामुळे पुढील 3, 4 तासांत पश्चिम किनार्यावर मध्यम ते तीव्र सरीची शक्यता वर्तवण्यात आल्याचं के एस होसाळीकर यांनी सांगितलं आहे.