मनसे प्रमुख राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून घरी परतले आहेत. यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. यात जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना करोना संसर्ग झाला होता, तेव्हा राज ठाकरे यांनी केलेल्या चौकशीबाबत कृतज्ञता व्यक्त केलीय. तसेच राज ठाकरे यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. आव्हाडांनी ट्वीट करत राजकारणात वाद असावेत द्वेष नाही असं मत व्यक्त केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात. आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हाल ही आई भवानीकडे प्रार्थना करतो. मला करोना संसर्ग झाला होता तेव्हा तुम्ही माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही.”
आपल्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ हा हॅशटॅगही वापरला आहे.
“आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या घरी परतले आहेत. राज ठाकरेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
“आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली होती. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. राज ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती मनसे प्रवक्त्यांनी दिली होती.
हेही वाचा : …तर माझ्या पक्षाकडून माझं ६ वर्षांसाठी निलंबन होऊन राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं : जितेंद्र आव्हाड
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आलं होतं.