Pune Cyber Crime: मुख्यमंत्री ठाकरे, पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; १३ जणांसह ‘फडणवीस फॅन क्लब’वर गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक आणि अश्लील मजकूर सोशल माध्यमात प्रसिद्ध केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आकाश शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Offensive Post Against Uddhav Thackeray )
राजकारण महाराष्ट्राचे हा फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब हा फेसबुक ग्रुप व ट्वीटर अकाऊंट, कोमट बॉइज अँड गर्ल्स हा फेसबुक ग्रुप तसेच इंटेलेक्च्युअल फोरम या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सातत्याने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांचे फोटो मॉर्फ करून त्यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहेत. शिवराय, जिजाऊ आणि संभाजीराजे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह मजकूर या ग्रुपच्या माध्यमातून सोशल माध्यमात पसरवण्यात आला आहे. त्यात काही पोस्टमध्ये शिवीगाळ तसेच जातींमध्ये तेढ निर्माण होईल असा प्रक्षोभक मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार आकाश शिंदे यांनी पुणे शहर सायबर पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोशल माध्यमांत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या या सर्व ग्रुपशी संबंधित नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहूडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले तसेच सर्व ग्रुपविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ तसेच भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके हे अधिक तपास करीत आहेत.