राजस्थानात गेहलोतांना टक्कर देणारे राजेंद्रसिंह गुढा शिंदेंच्या शिवसेनेत; जाहीर पक्षप्रवेश

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या एकेकाळचे जवळचे सहकारी राजेंद्रसिंह गुढा यांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी मुख्य़मंत्री खास राजस्थानमध्ये गेले आहेत. राजस्थानच्या राजकारणात सध्या एका लाल डायरीची बरीच चर्चा आहे, या लाल डायरीत राजस्थान सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा संपूर्ण काळा चिठ्ठा आहे. या डायरीमुळे मुळे मुख्यमंत्री गेहलोत यांची डोकेदुखी चांगलीच वाढलीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यावरून गेलहोत यांच्यावर टीका केली होती. ही लाल डायरी गुढा यांच्याच हातात आहे.
पक्षाला घरचा आहेर दिल्यामुळे झालेले बडतर्फ
गुढा यांनी मंत्री असताना जुलैमध्ये विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभेत काँग्रेस आमदारांनी मणिपूर हिंसाचार आणि मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण या मुद्द्यावर बोलताना राजेंद्रसिंह गुढा यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला होता. बलात्काराच्या बाबतीत राजस्थान प्रथम आहे. मणिपूरबद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या घरात डोकावलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी गहलोत सरकारवरच ताशेरे ओढले होते. काँग्रेस आमदारानं आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानं काँग्रेसच्या विधानसभेत अस्वस्थता निर्माण झाली होती. हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गुढा यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. पक्षाकडून बडतर्फ केल्यानंतर गुढा यांनी विधानसभेतच एक ‘लाल डायरी’ दाखवून आपल्याच पक्षाच्या सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता.
आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इनकम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. त्या दिवशी राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीबाबत गुढा यांनी गेहलोत सरकारविरोधात सातत्यानं आरोपांची माळच लावली होती. गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. तेव्हापासूनच भाजपनं सातत्यानं लाल डायरी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यानं लाल डायरीच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारला घेरलं आहे.