india

“तुम्हीसुद्धा कधीतरी गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा”; कंभोज यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजपाचा इशारा

भाजपाचे नेते मोहित कंभोज यांच्या गाडीवर ‘मातोश्री’ परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले. खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर वातावरण तापले होते. शिवसेना कार्यकर्ते त्या परिसरात मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कंभोज मातोश्री बंगल्यापुढे गाडीतून उतरले आणि व्हिडीओ शूटिंग करत होते. कंभोज पाहणी करीत असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांना आल्याने ते त्यांच्यावर धावून गेले. याबाबत आता भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे.

“भाजपाचा पोलखोलचा कार्यक्रम हा परवानग्या घेऊन चाललेला आहे. अधिकृत परवानग्या घेऊन मैदानांमध्ये, रस्त्यावर हा कार्यक्रम होत आहे. जनतेचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराची मांडणी आम्ही पोलखोलमधून करत आहोत. लोकशाही मार्गाने चाललेल्या या क्रायक्रमावर एखादी व्यक्ती हल्ला करते हे नामर्दपणाचे लक्षण आहे. शिवसेनेने हा दंगेखोरपणा थांबवावा. पोलिसांनी कायद्याचे राज्य आहे याचा परिचय मुंबई आणि महाराष्ट्राला द्यावा,” असे आशिष शेलार म्हणाले.

“मोहित कंभोज एका गाडीने जात होते. एकट्या व्यक्तीला बघून २५ लोकांनी एकत्र येऊन झुंडबळी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पोलखोलचे कार्यक्रम थांबवणार नाहीत. पण एकटे जाणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर २५ लोक हल्ला करत असतील तर तुम्हीसुद्धा कधीतरी गाडीने एकटे जाणार आहात हे लक्षात ठेवा. काळोखात अन्य ठिकाणाहून दगड येऊ शकतात याचे भान त्यांनी ठेवावे. जशास तसे उत्तर देण्यासाठी गेली २७ वर्षे आम्ही समर्थ आहोत. पण कायद्याच्या चौकटीत राहून अभियान करण्याची आमची भूमिका आहे. लोकशाहीला लोकशाहीने आणि ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ ,” असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

दरम्यान, आपण एक विवाह समारंभ आटोपून चाललो होतो. आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीतून उतरून माझ्या गाडीत बसण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो, असा दावा कंभोज यांनी केला. शिवसेना कार्यकर्त्यांनी कंभोज यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांकडे बॅट आणि अन्य साहित्य होते. त्यांनी गाडीची तोडफोड केल्याचा दावा कंभोज यांनी केला. कंभोज मातोश्री पुढेच गाडीतून का उतरले, असा सवाल शिवसेना कार्यकर्त्यांनी केला.

Related Articles

Back to top button