indiaMaharashtra

BEST strike: एसटीचा संप मिटताच मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बंड , मुंबईकरांचे हाल

मुंबई: तब्बल साडेपाच महिने सुरु असलेल्या आंदोलनामुळे राज्यातील एसटी सेवा आता कुठे पूर्वपदावर येत असताना आता मुंबईत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मुंबईच्या वडाळा, कुर्ला आणि वांद्रे आगारातील कंत्राटी तत्त्वावर कामाला असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी (BEST employees) गुरुवारी अचानकपणे काम बंद केले. त्यामुळे बेस्टच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे टाटा आणि केईएमकडे जाणारी बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.

बेस्टच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र, याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालय मार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या सगळ्यानंतर बेस्टच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाल सुरु केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंपनीला याबाबत कळवण्यात आले आहे. त्यानंतर कंत्राटी कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलत आहेत. मात्र, या वादावत अद्याप तोडगा निघालेला नाही.हा वाद चिघळू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन कंत्राटी बेस्ट प्रशासनाने बेस्टचे इतर नियमित कर्मचारी आणून बेस्ट सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Related Articles

Back to top button