पुण्यात मोठी कारवाई; वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दोन पोलिस निरीक्षकांमध्ये वादावादी झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाने वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत वसुली न करण्याच्या सूचना दिल्यानंतर या कर्मचाऱ्याने वरिष्ठ निरीक्षकांसोबत वाद घातल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी हद्दीत अवैध धंद्याना प्रोत्साहन देत असल्याचा ठपका ठेवून या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. (Pune Police Latest News)
श्रीधर पाटील असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील सिंहगड रोड पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहेत. ‘पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांमध्ये मलईवरून वादावादी’ अशा आशयाची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पुणे शहर पोलिस दलात खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बातमीची दखल घेऊन पोलिस निरीक्षकांना बोलावून घेतले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची काही दिवसांत विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. यानंतर आता वरिष्ठ निरीक्षकांनी वसुली न करण्याचे आदेश दिल्यानंतर वादावादी करणाऱ्या पोलिस कर्मचारी पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या दोन निरीक्षकांमध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर अवैध धंद्याचे पैसे गोळा करणारा कर्मचारी पाटील याला वरिष्ठ निरीक्षकांनी वसुली बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी पाटील यांनी नाराज होऊन ‘मी कोणालाच हे काम करू देणार नाही,’ अशी धमकी दिली होती. यावरून सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाटील अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन वसुली करीत असल्याचे दिसून येत असल्याचे सिद्ध होत आहे.
प्राथमिक चौकशीनुसार निलंबन
वरिष्ठ निरीक्षक आणि निलंबित कर्मचारी पाटील यांच्यातील वादावादीमुळे पोलिस अधिकारी व पाटील यांच्यात झालेला वाद सर्वांना लक्षात आला. हा विषय सामान्य नागरिक, पोलिस दलात चर्चेचा झाला. या प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा जनमानसात मलीन झाली. प्राथमिक चौकशीच्या अधीन राहून पाटील यांना निलंबित करण्यात येत असल्याचे उपायुक्त गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.