मुंबई : राजकारणात कितीही हेवेदावे असले, आरोप प्रत्यारोप होत असले तरी सुख-दु:खात राजकारण बाजूला ठेवून एकमेकांसाठी धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आज याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. भाऊ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळताच बहिण पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मु्ंडे (Pritam Munde) यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मु्ंडे या देखील सकाळीच रुग्णालयात पोहचल्या आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यंनी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटक आल्याची बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांना भोवळ आली होती, विकनेस आला होता, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहोत, आम्ही त्यांना भेटलो, ते उद्यापर्यंत रिकव्हर होतील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.