बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाला पुत्राचीच दांडी; मात्र राज ठाकरेंची एकच चर्चा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये तैलचित्राचं अनावरण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही. मात्र त्याचवेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाला शिंदे गटातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
अजित पवारांची हजेरी
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांची जयंती साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला सरकारकडून सर्वपक्षीय मान्यवरांना आमंत्रित केलं होतं. यामध्ये विरोधी पक्षाचे नेते अजित पवारांबरोबरच ठाकरे कुटुंबियांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. अजित पवार विधानभवनामध्ये या कार्यक्रमासाठी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती आणि त्याचवेळी राज ठाकरेंची उपस्थितीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या उपस्थितीमधून पुन्हा एकदा मनसे सत्तेत शिंदे गट-भाजपाबरोबर मांडीला मांडी लावून बसणार की काय यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.
LIVE UPDATES:
> अभिनेता प्रसाद ओक या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहे.
> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे विधानभवनातील कार्यक्रमाला उपस्थित.
> स्मिता ठाकरे, निहार ठाकरेही या कार्यक्रमासाठी विधानसभेच्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे.
> केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबरोबरच शिंदे गटातील अनेक आजी-माजी खासदारही विधानभवनातील या कार्यक्रमात हजर आहेत.
> बाळासाहेबांचा जीवनप्रवास दाखवणारी डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. या डॉक्युमेंट्रीमध्ये आनंद दिघे, एकनाथ शिंदेंबरोबरच अनेकांचे फोटो दिसत आहेत.
> बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांच्या व्हिडीओ क्लिप्सही या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आल्या.
> कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची क्लिपही दाखवण्यात आली.
> पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बाळासाहेबांचं तैलचित्र विधानसभेच्या सभागृहात लावण्याची मागणी केली. ही मागणी नार्वेकरांनी मान्य केली, असा उल्लेख या डॉक्युमेंट्रीमध्ये आहे.
> मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसहीत इतर मान्यवर तैलचित्राचं अनावरण करण्यासाठी मंचावर स्थानापन्न झाले.
> दिपक केसरकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची सन्मान करण्यात आला.
आदित्य ठाकरेंची टीका
दरम्यान, दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. आपल्या चित्राचं गद्दारांच्या हातून अनावरण होतंय हे पाहून बाळासाहेबांनाही वाईट वाटेल, अशा अशयाची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी या तैलचित्र अनावरण प्रकरणासंदर्भात बोलताना, “अडीच वर्षांपूर्वी तैलचित्र अनावरण होणं अपेक्षित होते. कुणी उपस्थित राहावे कुणी नाही हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे भाग्य शिंदे-फडणवीस सरकारला मिळालं आहे इतकेच मी सांगेन,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. तर सुनिल तटकरे यांनी, “मला या संदर्भात कोणतही आमंत्रण आलं नाही. उद्धव ठाकरे यांनी जाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मी ज्यावेळी विधानभवनात जाईल त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला अभिवादन करेल,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. रिगल चित्रपटगृहासमोरील बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं. यावेळी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.