sports

इंग्लंडच्या खेळाडूची माघार रैनाच्या पथ्यावर पडणार; IPL 2022 मध्ये या संघाकडून खेळणार

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेला सुरेश रैनाने सोशल मीडियावर अशी एक रिएक्शन दिली आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. सुरेश रैनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले आहे की, फायर है मैं… झुकेगा नही…. त्याच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे रैना पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार जाणून घ्या काय झाले.

आयपीएलच्या मेगा लिलावात रैनाला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. २००८ पासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या रैनाला यावेळी त्यांनी देखील खरेदी केले नाही. लिलावात रैनाची बेस प्राइस २ कोटी इतकी होती. पण सर्वांनीच पाठ फिरवली. अशाच चर्चा सुरू झाली की गुजरात टायटन्स संघ रैनाला संघात घेईल. रैनाने शेअर केलेल्या फोटोनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर एक मोहिम सुरू केली.

रैनाच्या चाहत्यांनी त्याला गुजरात संघात घेण्याची मागणी केली आहे. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy Pulled Out of IPL) ने आयपीएल २०२२ मधून माघार घेतली आहे. गुजरात संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. गुजरात संघाकडे अनुभवी फलंदाज नाही. अशात ते बदली खेळाडू म्हणून रैनाला घेऊ शकतात. रॉयसाठी गुजरातने २ कोटी रुपये मोजले होते. रैनाची बेस प्राईस देखील तितकीच आहे. गुजरात संघाकडे कर्णधार हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, साई सुदर्शन, अभिनव सदरांगनी सारखे फलंदाज आहेत. पण फलंदाजीच्या क्रमवारीत एकही अनुभवी भारतीय खेळाडू नाही. त्यामुळे संघात बॅटिंग लाइन अप मजबूत करण्यासाठी रैनाला स्थान दिले जाऊ शकते.

 

मिस्टर आयपीएल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रैनाने आतापर्यंत २०५ सामन्यात ३२.५१च्या सरासरीने ५ हजार ५२८ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. रैना हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने पहिल्या १२ हंगामात प्रत्येक वेळी ३००हून अधिक धावा केल्या आहेत. चेन्नईने जिंकलेल्या चार आयपीएल विजेतेपदावेळी तो संघासोबत होता.

गुजरातचा कर्णधार होता रैना

आयपीएलमधून जेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघाला दोन वर्षासाठी निलंबित केले होते. तेव्हा रैनाने २०१६ आणि १७ साली तेव्हाच्या गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. रैना या संघाचा कर्णधार देखील होता.

Related Articles

Back to top button