देश

पोलीस चौकशी होणार; फडणवीसांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम केले रद्द, म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर, ते उद्या चौकशीसाठी बीकेसी परिसरात जाणार होते. मात्र, आता यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. फडणवीस हे उद्या, रविवारी बीकेसी येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जाणार नाहीत. मुंबई सायबर पोलीस त्यांच्या चौकशीसाठी ‘सागर’ या निवासस्थानी जाणार आहेत. राज्याच्या गृहविभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर फडणवीस यांनी ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे. माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दिवसभर मी घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. मुंबईतील सायबर पोलिसांनी मला नोटीस पाठवली असून, उद्या बीकेसीत चौकशीसाठी बोलावले आहे, असे त्यांनी सांगितले होते. मी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन माझा जबाब नोंदवणार आहे, असे ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपकडून एक निर्णय घेण्यात आला होता. फडणवीस यांच्या समर्थनार्थ बीकेसी परिसरात एकवटणार असल्याचे भाजपने जाहीर केले होते. उद्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन फडणवीस यांना पाठिंबा देणार होते.

या घडामोडींनंतर राज्याच्या गृहविभागाची बैठक झाली. या बैठकीत पोलीस फडणवीस यांच्या घरी जाऊन चौकशी करतील, असा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आता मुंबई सायबर पोलीस फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन त्यांची चौकशी करतील. देवेंद्र फडणवीस यांनीही यासंबंधी एक ट्विट केलं आहे. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त यांनी मला दूरध्वनी केला होता. तुम्ही पोलीस ठाण्यात येण्याची काही आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक माहिती घेऊ, असे त्यांनी मला सांगितले, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासंबंधी त्यांनी दुसरे ट्विट केले आहे. त्यात मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दिवसभर मी घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र! असे त्यांनी त्यात नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button