Maharashtra Corona Crisis: महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन? धाकधूक वाढली; सर्वपक्षीय बैठकीत निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील काही दिवसांपासून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यातील कोरोना स्थिती पाहता शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे. जिथं दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातही निर्णय़ घेतला जाणार आहे. त्याशिवाय राज्यात सध्या लागू असणारे निर्बंध आणखी कठोर केले जाणार की त्यामध्ये शिथिलता आणली जाणार यासंदर्भात निर्णय होणार आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा उंचावता आलेख पाहता या पार्श्वभूमीवर येत्या काळात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ प्रशासन घेणार का, यासंदर्भातील धाकधूकही अनेकांनाच लागली आहे. त्यामुळं शनिवार या सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. सोबतच मुंबई लोकलबाबतही त्यांनी महत्त्वाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आता मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व पक्षांतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर कोणत्या निर्यणावर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
राज्यात वीकेंड लॉकडाऊन
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरु राहणार असून, सुपरमार्केट मात्र बंद असणार आहेत. तर, कोणालाही कारणाशिवाय प्रवासाची मुभा नसेल.