धक्कादायक! सोलापुरात पाकचे झेंडे असणारे फुगे विक्रीला; मुस्लीम बांधवांनी विक्रेत्याला पकडलं आणि…

सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत एका विकृताला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान असा मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री करत होता. अनेक मुस्लीम बांधव हे आपल्या मुलांना घेऊन नमाज पठणासाठी ईदगाह मैदानात येतात. अनेकदा ही लहान मुलं फुग्यासाठी हट्ट धरतात. नमाज पठणासाठी आलेले मुस्लीम बांधव हे मुलांच्या हट्टासाठी फुगे विकत घेतात. गुरुवारी सकाळी नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे लक्ष एका फुगेवाल्याकडे गेले. त्याच्याकडे असलेल्या फुग्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता. हे लक्षात येताच जागरूक मुस्लीम बांधवांनी ताबडतोब या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना माहिती दिली व फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजय पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नमाज सुरू होण्याआधी काही मुस्लीम बांधवांचं लक्ष गेल्यावर फुगेवाल्याला पाकिस्तान समर्थक मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री का करत आहेस, असा जाब विचारला. हे फुगे किती जणांना विकले, असे विचारला असता वादग्रस्त फुगेवाल्याची भंबेरी उडाली होती. हा फुगा एखाद्या मुस्लीम समाजातील लहानग्याने हातात घेतला असता आणि त्याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असते तर मोठे वादंग निर्माण झाले असते.
एमआयएमच्या वतीने निवेदन
एमआयएम नेते रियाज सय्यद यांनी या प्रकाराची तात्काळ गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनकडे निवेदन दिले आहे. मुस्लीम धर्मीयांच्या सणादिवशी ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री केल्याची बाब गंभीर आहे. हे फुगे विक्री करणारे सर्वसामान्य आणि गोरगरीब आहेत. पण यामागे षडयंत्र रचणारे कोण लोक आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवदेन पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांच्याकडे एमआयएमकडून देण्यात आले आहे.