पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरेंना पुन्हा डावललं, ‘तात्यांची’ थेट वरिष्ठांकडे तक्रार
Vasant More | मी एखाद्या बैठकीला गेलो नाही म्हणून लगेच माझे नाव वगळणे योग्य नाही. माझं असणं कोणाला खटकतंय, तेच कळत नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले. मात्र, मनसैनिका माझ्या बाजूने आहेत. तात्या कसा आहे, हे त्यांना माहिती आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पुणे: राज ठाकरे यांचे लागोपाठ दोन दौरे झाल्यानंतरही पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) अंतर्गत गटबाजी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसंत मोरे (Vasant More) यांना डावलल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून वसंत मोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून हे प्रकरण त्यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडे नेले आहे.
मनसेच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमंत्रणावरून या सगळ्या वादाला तोंड फुटले. पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोअर कमिटीत असलेले वसंत मोरे यांनाच या सगळ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप होत आहे. या बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवर वसंत मोरे यांचा उल्लेख नव्हता. पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीत एकूण ११ सदस्य आहेत. यापैकी वसंत मोरे वगळता उर्वरित १० सदस्यांच्या नावासमोर विशिष्ट विषयाचा उल्लेख आहे. फक्त माझ्याच नावाचा उल्लेख नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी एखाद्या बैठकीला गेलो नाही म्हणून लगेच माझे नाव वगळणे योग्य नाही. माझं असणं कोणाला खटकतंय, तेच कळत नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले. मात्र, मनसैनिका माझ्या बाजूने आहेत. तात्या कसा आहे, हे त्यांना माहिती आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले. मी महिनाभरापूर्वी पक्षाचा शहराध्यक्ष होतो, आताही सरचिटणीस आहे, कोअर कमिटीतही माझा समावेश आहे, याकडे वसंत मोरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मनसेतील वरिष्ठ नेते या सगळ्या वादावर तोडगा काढण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहावे लागेल.
‘माझी भूमिका एकला चलो रे असली तरी मी पक्षातच’
वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांत पुण्यातील मनसेचे कार्यक्रम आणि बैठकांपासून अंतर राखत असल्याचे चित्र दिसत आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोध मनसेने पुकारलेल्या आंदोलनावेळीही वसंत मोरे तिरुपतीला निघून गेले होते. यावरून पुणे मनसेत अंतर्गत धुसफुस सुरु झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे का, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर, वसंत तात्यांनी स्पष्टीकरण दिले होते. माझी भूमिका एकला चलो रे असली तरी मी पक्षातच आहे. राजसाहेबांसोबतच आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले होते.